वाहतूक साक्षरतेसाठी बालवयातच ट्रॅफिक सेन्स निर्माण होणे गरजेचे ; महासमादेशक अनिल शेजाळे

दर्पण न्यूज सांगली : बालवयातच ट्रॅफिक सेन्स निर्माण होणे गरजेचे आहे, तरच प्रत्येक नागरिकात वाहतूक साक्षरता निर्माण होईल व यासाठी शालेय अभ्यासक्रमात आरएसपी विषयी अनिवार्य हवा, असे प्रतिपादन वाहतूक सुरक्षा दल विभागाचे राज्यप्रमुख महासमादेशक अनिल शेजाळे यांनी केले.
राणी सरस्वती कन्या प्रशाला सांगली येथे आयोजित वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षणच्या सन 2025-26 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, वाहतूक निरीक्षक मिलिंद रजपूत, वाहतूक उपनिरीक्षक स्वप्नाली जाधव, तालुका समादेशक संभाजी भोसले, दिनकर खोत आदि उपस्थित होते.
महासमादेशक अनिल शेजाळे म्हणाले, यासाठी शालेय अभ्यासक्रमात आर. एस. पी. विषयी अनिवार्य व्हावा. या विषयासाठी सवलतीचे गुण आवश्यक असल्याचे सांगून शासन दरबारी पाठपुराव्याअंती लवकरच सवलतीचे गुण मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इयत्ता नववी ते बारावी माध्यमिक स्तर निर्माण केला असून त्यासाठीचा नववी, दहावीचा अभ्यासक्रम ही तयार झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले.
प्राचार्य डॉ. विकास सलगर म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात वाहतूक सुरक्षा विषयाचे महत्त्व अधोरेखित आहे, कारण वाहतूक व्यवस्था ही प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत अशी गरज बनली आहे. वाहतूक सुरक्षा विषयाचे शालेय जीवनातील महत्त्व आणि गरज यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. वाढते रस्ते अपघाताबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आणि अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी आणि आरएसपी विषयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली. परिवहन विभागातर्फे रजिस्ट्रेशन आरएसपी सहभागी शाळांना वाहतूक सिग्नल बोर्ड (फलक) देणार असल्याने शाळा आणखी बोलक्या होऊन वाहतूक साक्षरता होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
संयोजन आरएसपी अधिकारी सुषमा माळी, रणदिवे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले. आभार डॉ. माजित मुल्ला यांनी मानले. यावेळी आर एस पी अधिकारी, महिला व शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.