


दर्पण न्यूज पलूस (अभिजीत रांजणे) :-
पलूस तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज, रिक्त पदे, सार्वजनिक सुविधा आदी प्रश्नांवर चर्चा करून अधिकाऱ्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पारदर्शक व जबाबदारीने काम करणे जरुरीचे आहे. लोकांच्या भावनांचा विचार करून प्रशासकीय अधिकारी यांनी कामे करावीत, असा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी इशारा दिला. पलूस पंचायत समितीच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना ते अधिकारी यांना सूचना देत होते.
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, प्रशासकीय कालावधी संपून आता लोकप्रतिनिधींचा कालावधी सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसोबत समन्वय ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, स्थानिक स्तरावर न सुटणारे प्रश्न वरिष्ठ स्तरावर सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रामीण भागात स्मार्ट मीटरची सक्ती करू नये आणि वारंवार होणारी वीज कपात तातडीने थांबवावी, अशा सूचनाही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस जिल्हा बँक संचालक महेंद्रआप्पा लाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सभापती श्री. जगन्नाथ मोटे , जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, इतर जि प सदस्य,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
