

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- : *लोकनेते कै. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल (स्टेट बोर्ड)*, विटा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय परंपरेचे दर्शन घडविणारा भव्य पालखी सोहळा, दिंडी उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली सांगली जिल्ह्यातील बहे गावाहून आलेली वारकरी दिंडी. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसाने भारावून गेला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”, “राम कृष्ण हरी” या जयघोषांनी वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा संचारली.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून वारकरी संप्रदायाचे जिवंत दर्शन घडविले. पालखी सोहळा, अश्व रिंगण, अभंग गायन, वारकरी नृत्य, तसेच स्टेट बोर्ड आणि सीबीएसई विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीवर आधारित पारंपरिक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाठी-काठी प्रात्यक्षिकाने शौर्य, शिस्त, आत्मसंरक्षण आणि भारतीय युद्धकलेची परंपरा प्रभावीपणे उलगडून दाखविला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे *संस्थापक अध्यक्ष मा. ॲड. सदाशिवराव (भाऊ) पाटील, अध्यक्ष मा. ॲड. वैभवदादा पाटील तसेच कार्यकारी संचालक पी. टी. पाटील सर* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे *प्राचार्य सुहास तळेकर सर* यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “शिक्षणासोबत संस्कार हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख अधिष्ठान आहे. आषाढी एकादशीसारखे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रम विद्यार्थ्यांना आपल्या संतपरंपरेची, वारकरी चळवळीची आणि भारतीय संस्कृतीची जाणीव करून देतात. आधुनिक शिक्षणासोबत सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी *को-ओर्डीनेटर कल्पना पाटील* मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी मार्गदर्शन केले.
या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे नियोजन व आयोजन *सांस्कृतिक विभाग प्रमुख आनंद वाघमारे* व त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या टीमने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले. कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरण, दिंडी, पालखी सोहळा, अश्व रिंगण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्यवस्थापन यामध्ये त्यांच्या संघटित कार्याचे दर्शन घडले.
कार्यक्रमाचे प्रभावी, ओघवते आणि रसपूर्ण सूत्रसंचालन *राजेंद्र पाटील सर* यांनी केले.
समारोपाच्या वेळी पांडुरंगाच्या पालखीला पंढरपूरच्या दिशेने प्रतीकात्मक निरोप देण्यात आला. विठ्ठलाच्या नामस्मरणात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
