
दर्पण न्यूज भिलवडी ( अभिजीत रांजणे) :-माजी मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी वसगडे येथील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दिलेला शब्द पाळला आहे .
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी आज वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यावरील सुमारे ₹४ कोटी २० लाखांची व्याजाची रक्कम रेल्वे प्रशासनाने महसूल विभागाकडे जमा केली आहे, असे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
जमिनीचा मोबदला म्हणून ४ कोटी ३७ लाख २३ हजार रुपये आणि त्यावर तब्बल ४ कोटी २० लाख ३६ हजार रुपये व्याज अशी एकूण ८ कोटी ५८ लाख रुपयांची रक्कम प्रांत कार्यालयाच्या खात्यावर जमा झाली आहे. तसेच, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही आमदार डॉ विश्वजीत कदम दिली.
शेतकरी बांधव न्याय मागत होते. त्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाला न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. प्रशासनानेही याची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतली. आज शेतकरी बांधवांनी माझ्या हस्ते सरबत स्वीकारून आपले आंदोलन स्थगित केले. हा क्षण केवळ आंदोलन स्थगित होण्याचा नसून न्यायाच्या लढ्याला मिळालेल्या यशाचा आहे. शेतकऱ्यांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्यांच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि न्यायासाठी माझा संघर्ष यापुढेही तितक्याच ताकदीने सुरू राहील, असे ही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. जितेश कदम, अमोल पाटील तसेच वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
