दर्पण न्यूज मिरज/सांगली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली असून दि. १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे योजनेच्या निकषात बदल केला असून काही अटी वगळल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकची नोंदणी केलेली नाही त्यांनी अॅग्रिस्टॅकची नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., सांगली मार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज देत असून जिल्ह्यातील या बँकेची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत 50,060 सभासदांची 56,962 कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. वारसा पूर्तता न झाल्याने 129, आधार क्रमांक नसल्याने 12 व 1 हजार रूपये चे आतील 9 अशी एकूण 150 कर्ज खाती प्रलंबित आहेत.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांकासह आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त होताच गावातील तलाठी, ग्रामसेवक व संस्थेच्या सचिवामार्फत गावामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच बँकांच्या शाखेमध्ये सुद्धा यादी प्रसिद्ध केली जाईल.
शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावर तसेच पोर्टलवर विसंगतीबाबत नोंद करणे आवश्यक आहे. विसंगती दुरुस्ती करून झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
