दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील आठवडा बाजारात प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणारी घटना घडली. चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील सौ. अनिता दत्तात्रय खोत या पालेभाज्या खरेदीसाठी बाजारात आल्या असता, त्यांच्या कानातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग नकळत हरवली.
दरम्यान, ही रिंग बाजार परिसरात संजय कानकेकर यांना सापडली. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता संबंधितांची माहिती घेऊन सौ. खोत यांचे पती दत्तात्रय खोत यांना बोलावून सोन्याची रिंग त्यांच्या स्वाधीन केली. संजय कानकेकर यांच्या या प्रामाणिकपणाचे उपस्थितांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रवक्ते रामराव इंगळे-सरकार, कृष्णात उर्फ चदर खोत, नंदू भांदीगरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. संजय कानकेकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे बाजार परिसरात त्यांच्या या कृतीची दिवसभर चर्चा रंगली.
