

विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- : आज समाजात धर्मांधता, स्त्रियांवरील अत्याचार, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, जातीभेद, मग्रुरी, चोऱ्या, पेपरफुटी अशा अनेक समाजविघातक घटना वाढताना दिसत आहेत. या सर्वांच्या मुळाशी संस्कारांचा अभाव, आर्थिक व सामाजिक विषमता आणि सदाचरणापासून दूर गेलेली मानसिकता कारणीभूत आहे. शिक्षणाचा प्रसार होत असला तरी आदर्श नागरिक घडविण्यात आपण कमी पडत आहोत. चांगली माणसे घडविण्यासाठी प्रत्येक घरात विवेक, मानवता आणि समतेचे विचार देणारी पुस्तके पोहोचली पाहिजेत. लहानपणापासूनच मुलांमध्ये वाचनाची सवय रुजविणे ही काळाची गरज आहे. ‘चांगली माणसे घडविण्यासाठी वाचन प्रसार जाणीवपूर्वक करूया,’ असे आवाहन साहित्यवेल प्रकाशन, साताराचे प्रकाशक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले. ते भारतमाता ज्ञानपीठ संचलित सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशाला, विटा (जि. सांगली) येथे साहित्यवेल प्रकाशन, सातारा यांच्या ‘साहित्यवेल वाचन प्रसार चळवळी’चा प्रेरणादायी प्रारंभ समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सेवानिवृत्तीनंतर समाजाच्या हितासाठी वाचन प्रसार चळवळ आपण विटा येथून सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात भारतमाता ज्ञानपीठाचे संस्थापक तथा ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर, ‘फक्कड’ कादंबरीचे लेखक सचिन अवघडे, उपशिक्षक सागर कचरे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वतःच्या जीवनप्रवासाचा उल्लेख केला. “मी दहावीमध्ये पाच विषयांत नापास झालो होतो; मात्र वाचनाची सवय, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावर प्राध्यापक,साहित्यिक होऊ शकलो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना निराश न होता ज्ञानसाधनेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. शिक्षणाचा उद्देश केवळ गुण मिळविणे नसून संवेदनशील, विवेकशील, चारित्र्यसंपन्न आणि संविधाननिष्ठ नागरिक घडविणे हा असला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत प्रा. डॉ. वाघमारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील आदर्श वाचक विद्यार्थी असून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत. ग्रंथांचे सखोल वाचन करून त्यांनी विपुल ज्ञान संपादन केले आणि त्या ज्ञानाच्या बळावर स्वतःमध्ये, समाजात आणि देशात हितकारक व परिवर्तनशील बदल घडवून आणले. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर ग्रंथांचे नियमित वाचन करून ज्ञान, विवेक आणि सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे त्यांनी सांगितले…
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांशी साधलेला मुक्त संवाद. जिज्ञासा म्हणजे काय? जीवनाचे ध्येय कोणते? शिक्षण का घ्यायचे? वाचन कसे करावे? संविधान म्हणजे काय? चांगले आणि वाईट यांतील फरक कोणता? सत्य म्हणजे काय? मानवी उत्क्रांतीमध्ये माणूस वाचायला आणि लिहायला शिकल्यामुळे कोणते परिवर्तन घडले? इतर प्राणी आणि माणूस यांच्यातील मूलभूत वेगळेपण काय? तसेच ‘साहित्यवेल’ म्हणजे काय? अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. वरद पाटील ,श्रावणी माने ,पियुष ढवळे ,काव्या भिंगारदिवे ,मुद्रा पवार ,वेदांत काळे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे देत चर्चेत सहभाग नोंदविला. या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक विचार, संविधाननिष्ठा, वाचनाची आवड आणि सामाजिक भान विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरीसर यांनी आपल्या संस्थेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेची माहिती दिली. प्रशालेतील विद्यार्थी दररोज ग्रंथालयातून अवांतर पुस्तके वाचतात, असे सांगून त्यांनी शाळेत दरवर्षी ‘आदर्श वाचक पुरस्कार’ दिला जात असल्याचे नमूद केले. विशेष म्हणजे हा पुरस्कार विद्यार्थ्याला न देता त्याच्या पालकांचा सत्कार करून कुटुंबात वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला जातो, असे त्यांनी सांगितले. सी. डी. देशमुख यांचे उदाहरण देत त्यांनी महान व्यक्तींचे विचार आणि इतिहास समजून घेण्यासाठी पुस्तके हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे स्पष्ट केले. यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यापक वाचन आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
साहित्यिक सचिन अवघडे यांनी मोबाईलवरील ‘रील्स’च्या वाढत्या आकर्षणामुळे विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. निसर्गातील प्रत्येक घटक सातत्याने कार्यरत असतो; त्याचप्रमाणे वाचन ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाची अखंड चळवळ झाली पाहिजे. या चळवळीतून उद्याचे लेखक, प्रशासकीय अधिकारी आणि समाजाभिमुख नागरिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन करताना फौंडेशन विभाग प्रमुख सागर कचरे यांनी ज्ञानाच्या सामर्थ्यावर भाष्य केले. “पदांना मर्यादा असतात; पण ज्ञानाला सीमा नसतात,” असे सांगत त्यांनी प्रभावी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्वगुणांसाठी नियमित वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना सातत्याने ग्रंथवाचन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात विद्यार्थी वरद पाटील याने, “आदर्श नागरिक बनणे हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे,” असे मत व्यक्त केले, तर पियुष ढवळे याने “देश ज्या नीती, नियम आणि मूल्यांवर चालतो त्याला संविधान म्हणतात,” अशी समर्पक व्याख्या करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी ‘साहित्यवेल’ वाचन प्रसार चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन करण्यात आले. या चळवळीत युवक-युवती, शिक्षक, पालक आणि समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, प्रत्येक घरात दर्जेदार व विचारप्रवर्तक पुस्तके पोहोचवावीत, घराघरांत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. “घराघरात चांगली पुस्तके, प्रत्येक हातात पुस्तक आणि प्रत्येक मनात विवेक” हा साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीचा ध्यास असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सूत्रसंचालन सागर कचरे यांनी केले, तर प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
