दर्पण न्यूज प्रतिनिधी, बाबरे / शहापूर :
ए.बी.एम. समाज प्रबोधन संस्था संचलित आदिवासी कातकरी मुला-मुलींची अनुदानित आश्रमशाळा, बाबरे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी प्रवेशोत्सवास प्रमुख उपस्थिती लाभलेले आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर येथील प्रतिनिधी सी. आर. सोनावणे (गृहपाल, खर्डी), संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या चेअरमन पूनम भडांगे, प्राथमिक विभागाचे कार्यकारी चेअरमन संतोष पडवळ तसेच जीवनसंघर्षकार, साहित्यिक नवनाथ रणखांबे यांचे स्वागत केले.
यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवाच्याच दिवशी एकूण १५२ विद्यार्थी शाळेत दाखल झाले असून त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन शाळा, नवीन मित्र आणि नवीन शैक्षणिक प्रवासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी प्रास्ताविकातून शाळेतील विविध सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि शिस्तीचे नियम यांची माहिती दिली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण म्हणून शाळेत ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला होता. नवीन गणवेशात व हातात पाठ्यपुस्तके घेऊन विद्यार्थ्यांनी उत्साहाने सेल्फी काढत शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी जतन केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षिका सुप्रिया भोईर यांनी केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कपिल सातपुते यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले. प्रवेशोत्सवामुळे संपूर्ण आश्रमशाळा परिसर आनंद, उत्साह आणि नव्या शैक्षणिक उमेदीने भारावून गेला होता.