
दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी : भारतीय औद्योगिक क्षेत्राचे शिल्पकार आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक स्वर्गीय लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, पलूस येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांच्या हस्ते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
प्रदीपआप्पा कदम यांनी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या ग्रामीण भारताच्या औद्योगिक विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आधुनिक भारताच्या औद्योगिक प्रगतीत किर्लोस्कर उद्योगसमूहाचे महत्त्वपूर्ण स्थान असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेकांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया असे आवाहन प्रदीपअप्पा कदम यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी अनिल पाटील, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अंकुश राजमाने,अर्जुन भंडगे,विकी तातुगडे,विजय परबत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.