दर्पण न्यूज मिरज /सांगली : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 साठी गुरूवार, दिनांक 18 जून 2026 रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी, तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील एकूण 5 मतदान केंद्रांच्या इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
आदेशात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरणे, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करण्यास मनाई केली असून मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यासही मनाई केली आहे.
हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावित असणाऱ्या शासकीय कर्मचारी /अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दि. 18 जून 2026 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्राचे स्थान व ज्या इमारतीत मतदान केंद्र असेल ती इमारत पुढीलप्रमाणे – (1) तहसिल कार्यालय कडेगाव, (2) उप विभागीय अधिकारी खानापूर भाग विटा यांचे कार्यालय, (3) तहसिल कार्यालय वाळवा ईश्वरपूर, (4) अप्पर तहसिल कार्यालय, सांगली, जुना पुरवठा विभाग, (5) तहसिल कार्यालय जत.
मतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संपन्न
: सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 साठी दिनांक 18 जून 2026 रोजी मतदान होत आहे तर दिनांक 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमास सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे विष्णू खाडे तसेच संबंधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक-2026 ची मतमोजणी तरूण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे सकाळी 8 वाजलेपासून होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी यावेळी म्हणाले.
यावेळी सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सांगली जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप व शिवाजी विद्यापीठाचे विष्णू खाडे यांनी मतमोजणी प्रक्रियेबाबतची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये, वैध व अवैध मतपत्रिका, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना याबाबत सखोल उदाहरणासह मार्गदर्शन करण्यात आले.