दर्पण न्यूज मिरज /सांगली : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सद्यस्थितीत आटपाडी तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खाजगी टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली.
कार्यकारी अभियंता संजय येवले म्हणाले, सद्यस्थितीत आवश्यकतेनुसार टँकर व विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज रोजी जिल्ह्यात 5 खाजगी टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 10 गावात 13 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टँकरद्वारे आटपाडी तालुक्यातील पिंपरी बु., कुरूंदवाडी येथे तसेच जत तालुक्यातील गिरगाव व सिंदूर येथे प्रत्येकी एक खाजगी टँकर आणि आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी, पिंपरी खु. या दोन गावांसाठी एक खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
खानापूर तालुक्यातील रेवणगाव, ऐनवाडी, शिराळा तालुक्यातील बांबवडे, करमाळे, रांजणवाडी आणि कापरी, तासगाव तालुक्यातील नरसिंगपूर आणि कापूरगाव, जत तालुक्यातील सिंदूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे बोअर व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार टँकर सुरू करणे तसेच विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, ज्या भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढेल त्या ठिकाणी तातडीने अतिरिक्त उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.