दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), कृती छत्रपती संभाजीनगर विभागाने परंडा शहरात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध धडक कारवाई करत 57 हजार 200 रुपयांचा अवैध अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. 15 जून 2026 रोजी ANTF ला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, परंडा शहरातील शासकीय रुग्णालयाच्या मागील परिसरात एक व्यक्ती नशेच्या गोळ्यांची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे ANTF पथकाने दोन पंच व अन्न व औषध प्रशासन निरीक्षक यांच्या उपस्थितीत सापळा रचला.
छाप्यात शाहीद सादीक शेख (वय 39, रा. परंडा, जि. धाराशिव) यास ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून Nitrazepam आणि Alprazolam घटक असलेल्या एकूण 118 नशेच्या गोळ्या आढळून आल्या. यामध्ये Niteor-10, Nizascen-10 आणि Anzilum-0.5 या गोळ्यांचा समावेश आहे. तसेच नशेच्या गोळ्यांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणारा विवो कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 390/2026 अन्वये NDPS Act कलम 8(C), 22(A) तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा कलम 18(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह, पोलीस अधीक्षक श्री. अजीत टिके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साईनाथ ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी केली.