दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव, दि. १५ जून : धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेमध्ये ग्रामसेवकांच्या बनावट सह्या, बनावट शिक्के, खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात बोगस नोंदण्या करून शासन निधीचा अपहार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी राज्य शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कामगार विभाग तसेच जिल्हा प्रशासनाला सविस्तर स्मरणपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी दि. ०६ एप्रिल २०२६ रोजीही निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस चौकशी अथवा कारवाई न झाल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी, दलाल, एजंट, गुत्तेदार व कंत्राटदार यांच्या संगनमतातून शासनाची फसवणूक झाल्याचा संशय अधिक बळावला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
धाराशिव, कळंब व तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणीची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समुद्रवाणी, वलगूड, जुनोनी, झरेगाव, सांगवी, गोपाळवाडी, ढोकी, शिंगोली, सूंभा, पानगाव, मोहा, लोहटा (पूर्व), उपळाई, शिराढोण, नायगाव, मासा, कनेरवाडी, ढेकरी यांसह विविध गावांमधील नोंदणींची विशेष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित कामगारांनी प्रत्यक्षात ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले होते का, याची पडताळणी हजेरीपत्रक, वेतन नोंदी, बँक व्यवहार, पीएफ, ईएसआयसी, विमा पॉलिसी, कामाचे ठिकाण, वर्क ऑर्डर, टेंडर, करारनामे, मोजमाप पुस्तिका (एम.बी.), पूर्णत्व प्रमाणपत्रे तसेच जिओ-टॅग फोटो व जीपीएस लोकेशनच्या आधारे करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्या प्रकरणांमध्ये ९० दिवसांच्या कामाचा पुरावा उपलब्ध नाही, पीएफ व विमा नोंदी उपलब्ध नाहीत, वेतन व्यवहाराचे पुरावे नाहीत किंवा प्रत्यक्ष कामच अस्तित्वात नाही, अशा सर्व नोंदण्या बोगस घोषित करून तत्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT), आर्थिक गुन्हे शाखा (EOW) अथवा स्वतंत्र सक्षम यंत्रणेमार्फत करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा
दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी निवेदन देऊनही आणि आता स्मरणपत्र सादर करूनही शासनाने व प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू केली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) च्या वतीने जिल्हास्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनाची तारीख व स्वरूप लवकरच जाहीर करण्यात येईल. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.