

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) – विटा नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या मराठी शाळांमधील नवीन प्रवेश विद्यार्थी संख्येइतकी झाडे लावण्याचा संकल्प करून शिक्षण आणि पर्यावरण यांची सुंदर सांगड घालण्यात आली.
या उपक्रमाचा शुभारंभ शाळा क्रमांक २ व शाळा क्रमांक ४ मधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. ज्ञानाच्या मंदिरात पहिले पाऊल टाकताना विद्यार्थ्यांच्या हातून हरित भविष्यासाठी रोपांची लागवड करण्यात आली, हा क्षण खरोखरच प्रेरणादायी ठरला.
यावेळी आमदार सुहास भैय्या बाबर, नगराध्यक्षा सौ. काजल काकी म्हेत्रे, मा.नगराध्यक्ष श्री. नंदकुमार पाटील, शिक्षण सभापती डॉ. लीलाताई भिंगारदेवे, आरोग्य समिती सभापती भालचंद्र भैया कांबळे, नगरसेविका भाग्यश्री ताई तारळकर, मा. नगरसेवक अविनाश चोथे, रोहित पाटील, रामण्णा भिंगारदेवे तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवोदित विद्यार्थ्यांचे शाळेचा गणवेश, पाठ्यपुस्तके व पुष्प देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शिक्षण, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन यांचा संदेश देणारा हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला.
“एक विद्यार्थी –एक झाड, शिक्षणासोबत हरित भविष्याचा संकल्प!”