

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस प्रतिनिधी -: विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना सुखी करण्यासाठी करिअर घडवावे, तर पालकांनीही थॉमस एडिसनच्या आईप्रमाणे आपल्या मुलांमध्ये “तू करू शकतोस” हा आत्मविश्वास निर्माण करावा. भीती किंवा संभ्रम न बाळगता आत्मविश्वासपूर्वक धाडसाने निर्णय घ्यावेत. असे प्रतिपादन करिअर काउन्सिलर व यशस्वी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. तोहिद मुजावर यांनी केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्याची योग्य दिशा मिळावी या उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला “विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळा” रविवारी पलूस येथील श्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रा. तोहिद मुजावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव घोंडीराम शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीव्हीपी आयटी, सांगलीचे प्रा. रोहित पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम, सरकारी आयटीआय पलूसचे अमोल चव्हाण, साई कम्प्युटरचे सोमनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कटारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सचिव महेश साळुंखे तसेच सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव उपस्थित होते.
प्रा. मुजावर यांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी, शिष्यवृत्ती योजना, उच्च शिक्षणाचे पर्याय, सरकारी व खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, अभियांत्रिकी क्षेत्रातील बदलते प्रवाह आणि करिअर नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या आधारे नव्हे तर स्वतःच्या क्षमता, आवड आणि कौशल्यांच्या आधारे करिअरची दिशा निवडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “आपण करिअरची वाट निवडताना ती नेमकी कशासाठी निवडत आहोत याचे भान असणे आवश्यक आहे. आपल्या आई-वडिलांनी घेतलेले कष्ट आणि त्याग लक्षात ठेवून शिक्षणाकडे पाहिले पाहिजे. आयुष्यात एखाद्या टप्प्यावर अपयश आले तरी ते कायमचे नसते. ‘उद्याचा दिवस माझा असेल’ ही जिद्द मनात ठेवून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करिअरची निवड करताना भीती किंवा संभ्रम न बाळगता आत्मविश्वासाने आणि धाडसाने निर्णय घ्यावेत. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, आवड आणि कौशल्ये वेगवेगळी असतात. त्यामुळे इतरांच्या दबावाखाली न येता स्वतःसाठी योग्य क्षेत्र निवडणे आवश्यक आहे. जिंकणे आणि हरणे हे मैदानावर जाण्यापूर्वीच आपल्या विचारांमध्ये ठरत असते. त्यामुळे सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि शिस्त या यशाच्या गुरुकिल्ल्या आहेत.”
आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी तांत्रिक कौशल्ये आणि इंजिनिअरिंग स्किल्स महत्त्वाची ठरत असल्याचे सांगत त्यांनी मेडिकल आणि टेक्निकल क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःला नेमके काय जमत आहे याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजची पिढी विचारांनी अधिक प्रगल्भ असल्याचे सांगत त्यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी थॉमस एडिसनचे उदाहरण देत सांगितले की, शाळेने एडिसनला गतिमंद समजून बाहेर काढले होते. मात्र त्याच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. “तू सर्वांत हुशार आहेस” हा विश्वास दिल्यामुळेच एडिसन पुढे जाऊन जगातील महान शास्त्रज्ञ ठरला. त्यामुळे पालकांनी आपल्या मुला-मुलींना सातत्याने प्रोत्साहन देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात प्रदीप (आप्पा) कदम यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना सांगितले की, दहावी आणि बारावीनंतर अनेक विद्यार्थी व पालक करिअरच्या निवडीबाबत संभ्रमात असतात. हा संभ्रम दूर करून त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडवावे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रा. रोहित पाटील यांनी विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना कोणत्या बाबींचा विचार करावा, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कोणत्या क्षेत्रांना अधिक मागणी आहे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत याबाबत मार्गदर्शन केले.
सरकारी आयटीआयचे अमोल चव्हाण यांनी नववी नापास, दहावी उत्तीर्ण तसेच बारावीनंतर आयटीआयमध्ये उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देत कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.
या मार्गदर्शन सोहळ्यात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले. प्रा. तोहिद मुजावर यांनी प्रत्येक प्रश्नाचे समर्पक आणि सविस्तर उत्तर देत विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या. योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
गायत्री निकम यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी साक्षी संतोष वायदंडे या बोलताना म्हणाल्या प्रदीप आप्पांच्या मुळे आज आम्हाला ग्रामीण भागात आम्हाला करिअर मार्गदर्शन मिळवून दिले याबद्दल आम्ही त्यांचे शतशा आभारी आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटक विजया गुरव, महेश हजारे तुषार सूर्यवंशी, शुभम निकम उल्हास पाटील अनिल पाटील अभिजीत कौलगे सत्यजित पिसाळ सागर कदम विकास कदम विकास आरबुणे खंडेराव ठोंबरे,कृष्णा मिठारी,भास्कर संकपाळ, हरीश वडार,गणेश पवार, अर्जुन भंडगे, नंदकुमार निकम,यांच्यासह परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्गदर्शन सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरविषयी स्पष्ट दिशा मिळाली असून, योग्य मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी प्रदीप (आप्पा) कदम यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे स्संवागत जय शिंदे यांनी केले. अभिजीत सावंत यांनी प्रास्ताविक केले. अंकुश राजमाने यांनी सूत्रसंचालन केले. अमीर पठाण यांनी आभार मानले.