
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने)- : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नगर परिषद शाळा क्रमांक 23 येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संयोजक नितीन काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आनंददायी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना वही, पेन व अन्य आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी नितीन काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हेच व्यक्तीच्या प्रगतीचे आणि राष्ट्राच्या विकासाचे प्रमुख साधन असून प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द, शिस्त आणि परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी पद्धतीने झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्सुकता पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी श्री. बिभीषण लोंढे, श्री. किशोर पवार, श्री. शिवा तुपे, श्री. शाहबाझ शेख, श्री. जावेद पठाण, श्री. शाहरुख शेख तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला असून उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.