दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने)- : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)चे धाराशिव जिल्हाप्रमुख राज धज यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील एका कर्मचाऱ्या विरोधात सरकारी जागेच्या कथित विक्रीप्रकरणी तक्रार केल्याचा राग मनात धरून संबंधित कर्मचाऱ्याने आयुष्य बरबाद करून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.
राज धज यांनी धाराशिव जिल्हाधिकारी यांना 11 जून रोजी दिलेल्या निवेदनानुसार, नगरपालिकेने सन २००३ मध्ये सर्व्हे क्रमांक २०६/२ मधील जागा आरक्षित केली असून ती जागा पालिकेने मोबदला देऊन अधिग्रहित केली आहे. मात्र, काही व्यक्तींनी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या क्षेत्रातील जमिनीची विक्री केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी यापूर्वीही तक्रार करून चौकशीची मागणी केली होती.
संबंधित व्यवहारा संदर्भातील खरेदीखत आणि नंतरचे दस्तऐवज पाहता सर्व्हे क्रमांक २०६/२ मधील सुमारे ३० आर क्षेत्र हे नगरपालिकेच्या मालकीचे असल्याचे दिसून येते. याबाबत सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप राज धज यांनी केला आहे.
राज धज १० जून रोजी सहजिल्हा निबंधक कार्यालयात गेले असता संबंधित कर्मचारी तेथे आला. चर्चा संपल्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यावर त्याने “तू माझ्या नादाला लागू नकोस, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन,” अशी धमकी दिली. तसेच भविष्यात आपल्यावर हल्ला, शिवीगाळ किंवा खोटे गुन्हे दाखल झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कर्मचारी तसेच व्यवहाराशी संबंधित व्यक्तींवर राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राज धज यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सहजिल्हा निबंधक कार्यालयाकडे केली आहे. निवेदन देताना कुमार गायकवाड, प्रमोद कांबळे, अनिल वाघमारे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.