दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी ( शिराज शिकलगार):- जीवन जगताना अनेक गुणांचा आणि सामर्थ्याचा गुणाकार करायला पु. ल.देशपांडे यांनी शिकवले. रोजचा दिवस कितीही संकटाचा असो तो उत्सव म्हणून साजरा करावा असे ते म्हणत. त्यांनी लिहिलेली नाटके, दिलेले संगीत, त्यांचे एकपात्री प्रयोग आणि त्यांची विनोदी पुस्तके मराठी साहित्याचा अनमोल खजिना आहे. पु.ल.ना मुले आवडत. जो जीवनाशी एकनिष्ठ राहतो त्यांना जगण्याचा आनंद मिळतो. आनंदी जीवन ही माणसाची सर्वोत्तम देणगी आहे असे पु.ल. मानीत. असे विचार डॉ. मानाजी कदम यांनी मांडले. सौ विजयमाला पतंगराव कदम प्राथ. माध्य. उच्च माध्यमिक शाळेत कै. पु. ल. देशपांडे व कै. ॲड काकासाहेब जाधव यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. स्नेहा मानाजी कदम या होत्या. डॉ. स्नेहा कदम आपल्या भाषणात म्हणाल्या- काही मोठी माणसे जग सोडून जातात पण त्यांचे व्यक्तिमत्व सतत स्मरणात राहतात .पु.ल.देशपांडे महाराष्ट्र व्यापलेले व्यक्तिमत्व होते. पु.ल फक्त हसवत नव्हते ते माणुसकी शिकवत होते.ॲड काकासाहेब हे मोठे व्यक्तिमत्व होते.
प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांच्या हस्ते पु.ल. देशपांडे व ॲड. काकासाहेब जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी पु .ल .देशपांडे काकासाहेब जाधव व शाळा यांचे ऋणानुबंध उलगडून दाखवले. त्यावेळी शरण्या जंगम, मृणाल कुलकर्णी, राजदीप खरजे, सार्थक पवार, सम्रिज्ञी गायकवाड, श्रेया जाधव या विद्यार्थ्यांनी पु.ल.देशपांडे व ॲड.जाधव यांच्यावर भाषणे झाली. योगेश्वर मेटकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुप्रिया मेटकरी यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विद्यार्थी , शिक्षक , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू गारोळे यांनी आभार मानले.