दर्पण न्यूज मिरज / सांगली : सांगली जिल्ह्यात सन 2026 मध्ये कृषी दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 जुलैपासून 15 लाख वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी वृक्षारोपणासाठी जागेची निवड करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. त्या अनुषंगाने आवश्यक रोपे पुरविण्यात येतील. वृक्षारोपणासाठी जागेची निवड करताना झाडे जगविण्यासाठी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जवळपास आहे, अशा जागेची निवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
राज्याचे वनाच्छादन व वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के पर्यंत वाढविण्याकरिता संपूर्ण राज्यात सन 2026 ते सन 2047 पर्यंत 300 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअनुषंगाने सांगली जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, सामाजिक वनीकरण सांगलीचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, आभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रविंद्र व्होरा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी प्रत्यक्ष तर दूरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी विविध विभागांना वृक्षारोपणासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाबद्दल सविस्तर आढावा घेतला. या सर्व मोहिमेमध्ये खाजगी व स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे व वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी केले.