दर्पण न्यूज मिरज /सांगली : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी विविध बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह नोडल अधिकारी व सातारा जिल्ह्यातील अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक-2026 निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व नोडल अधिकारी यांनी कामकाज करावे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
या निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात एकूण 14 नोडल अधिकारी व तितकेच सहाय्यक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे पालन, विविध परवानग्या, जाहिरात प्रमाणिकरण, निवडणूक विषयक विविध अहवाल, मतपत्रिका छपाई, कर्मचारी व्यवस्थापन, नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान व मतमोजणीची पूर्वतयारी आदि बाबींच्या अनुषंगाने आढावा घेतला.