दर्पण न्यूज मिरज / सांगली : बँकांनी त्यांच्याकडे पीक कर्जासाठी आलेली प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. प्रस्तावात काही त्रुटी असतील त्याची पूर्तता संबंधितांकडून करून घ्यावी व पीक कर्जाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्रनाथ श्रीवास्तव, जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक निखील सावळे, सोलापूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, सहाय्यक निबंधक अनुराधा काटकर, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, ज्या बँकांची गतवर्षी पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी झालेली नाही, त्यांनी कामगिरी सुधारावी व यावर्षी आत्तापासूनच त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीची दक्षता घ्यावी. प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजना, महिला आर्थिक विकास महामंडळ, पी.एम.एफ.एम.ई. योजना, ए.आय.एफ.योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या जमाती विमुक्त जाती विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना आदि योजनांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक निखील सावळे यांनी विविध बँकांनी केलेल्या उद्दिष्टपूर्ततेबाबतचे सविस्तर सादरीकरण केले.
यावेळी डिस्ट्रीक्ट क्रेडिट प्लॅन 2026-27 या पुस्तिकेचे तसेच आरसेटीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वार्षिक उपक्रम अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वर्ष २०२५-२६ साठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी व मावळते जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी राज्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून दिलेल्या प्रशंसा प्रमाणपत्राचे वितरण जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते करण्यात आले.