दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
बार्शीच्या राजकारणात राजेंद्र #राऊत हे नाव केवळ माजी आमदार म्हणून घेतले जात नाही; सध्या ते एक स्वतंत्र राजकीय केंद्र म्हणून पाहिले जातं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतील घवघवीत यश हे या मागचे मोठे कारण आहे. #भाजपने सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी राऊत यांना उमेदवारी जाहीर केल्याने हा निर्णय केवळ उमेदवारीचा नसून, विधानसभा पराभवानंतरही बार्शीतील राऊत गटाचे राजकीय वजन कायम असल्याचा संदेश आहे,असच म्हणावं लागेल. मास लीडर म्हणून त्यांच्याकडे भाजपने पाहिले. या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी होणार असून, सोलापूर मतदारसंघात एकूण ६१६ मतदार आहेत; त्यापैकी भाजपचे ३०७ आणि महायुतीचे चारशेहून अधिक संख्याबळ असल्याचे वृत्त आहे.
राऊत यांचा राजकीय प्रवास हा राजकीय दिग्गज असलेल्या माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या प्रस्थापित राजकारणाला दिलेल्या सातत्यपूर्ण आव्हानातून उभा राहिलेला आहे. साधारण १९९९ मध्ये राऊत यांनी शिवसेनेकडून लढत दिली, पण सोपल अवघ्या ३३९ मतांनी विजयी झाले. २००४ मध्ये राऊतांनी ७३,४०१ मते घेत सोपल यांचा ५,२२० मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून ९५,४८२ मते मिळवत सोपल यांना ३,०७६ मतांनी हरवले. ही आकडेवारी राऊतांच्या राजकारणातील मुख्य सूत्र सांगते, पक्ष कोणताही असो, बार्शीत त्यांचा स्वतःचा मतदारवर्ग आहे. सोपल विरुद्ध राऊत हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राने सातत्याने निवडणुकीत पाहिलेला आहे.
दरम्यान २०२४ मध्ये सोपल यांनी देखील ‘कमबॅक’ केले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोपल यांना १,२२,६९४ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट ) कडून लढलेल्या राऊतांना १,१६,२२२ मते मिळाली. फरक साधारण ६,४७२ मतांचा राहिला. पराभव झालेला असूनही राऊतांनी घेतलेली मते त्यांच्या संघटनशक्तीची जाणीव करून देतात असं राजकीय निरीक्षण. बार्शी तालुका मतदारसंघ हा #व्यक्तीकेंद्रीत असल्याची पुन्हा पुन्हा जाणीव होते.
राजकीय निरीक्षणातून पाहिले, तर #भाजपने #राऊतांना विधानपरिषदेसाठी पुढे करणे हे तीन पातळ्यांवर महत्त्वाचे आहे. पहिले म्हणजे बार्शीतील सोपल प्रभावाला तोल देणे, दुसरे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांमध्ये मजबूत पकड असलेला चेहरा असलेला नेता, तिसरे म्हणजे २०२४ च्या पराभवानंतरही राऊतांना राजकीय प्रवाहात ठेवून पश्चिम सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हालचाली आणि समीकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या जागेसाठी प्रशांत परिचारक यांच्यासह इतर नावांची चर्चा होती; तरी भाजपने राऊतांवर शिक्कामोर्तब केले, हे पक्षाच्या स्थानिक गणिताचे संकेत देणारे आहे. भाजपा जेव्हा एखादे नाव पुढे आणते तेव्हा तेव्हा त्या मागे रणनीती आणि पुढील आराखडे निश्चित असतात.
पराभवानंतर अनेक नेते राजकीयदृष्ट्या मागे पडतात; मात्र राऊतांनी बार्शीमध्ये उलट आक्रमक पुनर्रचना केली. बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवरील राजकीय हालचालींमधून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव टिकवून ठेवला. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत राऊत गटाच्या बळीराजा विकास आघाडीने विजय मिळवल्याने सोपल गटाला धक्का बसला होता.
बार्शीतील राऊत विरुद्ध सोपल संघर्ष हा केवळ दोन व्यक्तींचा संघर्ष नाही; तो जुन्या प्रस्थापित राजकारणाविरुद्ध नव्या संघटनाधारित राजकीय शक्तीचा संघर्ष आहे. सोपल यांनी दीर्घकाळ बार्शीचे प्रतिनिधित्व केले, तर राऊतांनी त्यांच्या विरोधातून स्वतःची ओळख घडवली. १९९९ चा अल्प फरक, २००४ चा विजय, २०१९ चा अपक्ष विजय आणि २०२४ चा पराभव या सर्व टप्प्यांतून राऊतांनी बार्शीत स्वतःला कायम निर्णायक घटक म्हणून सिद्ध केले.
विधानपरिषद उमेदवारीमुळे राऊत यांना आता नवी राजकीय इनिंग मिळाली आहे. ही संधी मिळाल्यास त्यांचे पुनरागमन केवळ वैयक्तिक नसेल; ते बार्शीतील राऊत गटाच्या राजकीय पुनर्स्थापनेचे प्रतीक ठरेल. विधानसभा पराभवानंतरही ज्याचा दावा संपत नाही, ज्याची संघटना ढासळत नाही आणि ज्याच्यावर पक्ष पुन्हा विश्वास ठेवतो, तो नेता स्थानिक राजकारणात अजूनही जिवंत आणि प्रभावी असतो राजेंद्र राऊत यांची उमेदवारी हेच दाखवते. डबल ताकद मिळालेल्या येणाऱ्या काळात बार्शी तालुका विकासाचा कोणता #टप्पा गाठतो हे पाहण्यासाठी बार्शीकर उत्सुक असल्याचे दिसत आहे.