

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस प्रतिनिधी : ज्या देशातील तरुण सशक्त आणि बलवान असतो तेच राष्ट्र बलवान असते.असे बलवान आणि लाल मातीतील रांगडे पैलवान तयार करून लाल मातीची परंपरा जपण्याचे कार्य पैलवान संभाजी जाधव करत आहेत.असे गौरवोद्गार स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती करून समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांनी काढले.
रामानंदनगर येथे प्रदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पैलवान संभाजी जाधव (पुणदी) कुस्ती संकुल रामानंदनगर येथे आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला.
प्रदीप (आप्पा) कदम यांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना लाल मातीची परंपरा जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य पै.संभाजी जाधव आणि त्यांच्या कुटुंबाने केले आहे. शिबिरात सहभागी झालेल्या नवोदित पैलवानांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोगी व सुदृढ आरोग्य राखण्याचा सल्ला दिला. तसेच कुस्ती संकुलाला शासन स्तरावरून व स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासनही दिले. प्रदीप अप्पा कदम पुढे म्हणाले, ज्या देशाची तरुण पिढी बलवान आहे, सशक्त आहे तोच देश जागतिक कारणांमध्ये टिकू शकतो. एका अर्थाने संभाजी जाधव हे अनेक मोठमोठे पैलवान तयार करून देश बलवान करण्याचे कार्य करत आहेत. याचा आदर्श घेऊन तरुण पिढीने आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवले पाहिजे.
यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नारायण साळुंखे,आमिर पठाण, संजय शिंदे, कुस्ती संकुलाचे संस्थापक संभाजी जाधव, वस्ताद सूर्यकांत जाधव, अभिजीत कौलगे, तुषार सूर्यवंशी तसेच सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मिठारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना पैलवान हणमंत जाधव यांनी केले. विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक व कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
याप्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नारायण साळुंखे, आमिर (भैय्या) पठाण आणि कृष्णा मिठारी यांनीही मनोगत व्यक्त केले.