

दर्पण न्यूज विटा-खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार ) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा नगरपरिषद हद्दीतील विटा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नगरपरिषदेकडून तोडगा निघणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान( जिल्हास्तर) अंतर्गत भटक्या कुत्र्यांसाठी कायमस्वरूपी निवारा केंद्र ( शेल्टर). उभारण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामासाठी ४४ लाख ८५ हजार रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. सध्या या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. विटा शहरातील व उपनगरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे नागरिकांना याचा त्रास होत आहे. झुंडीने ही कुत्री फिरत असल्याने महिला व नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. एक वर्षांपूर्वी विटा कराड रोड येथील विवेकानंद नगर येथे भटके कुत्रे पिसाळल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. एका नागरिकाचा या पिसाळलेल्या कुत्र्याने चावाही घेतला होता.विशेषत: रात्रीच्या वेळी ही कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याचे पहावयास मिळत आहे विटा शहरातील साळशिंगी रस्ता व हजारे मळा परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील आदर्श कामधेनु संशोधन संस्थेच्या माध्यमातून भटकी कुत्री पकडणे त्याचे लसीकरण व नसबंदीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आज अखेर एकूण ४५२ भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण व नसबंदी केली आहे. सध्या विटा नगर परिषदेकडे तात्पुरते स्वरूपातील निवारा केंद्र उपलब्ध असून त्या ठिकाणी पकडलेल्या कुत्र्यांची आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. कायमस्वरूपी आधुनिक निवारा केंद्र उभारल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनास अधिक गती मिळणार असून नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता विटेकर नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या पासून मुक्ती मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत.
————————-
विटा नगरी परिषदे कडून प्राणिमित्र संस्था व पशुवैद्यकीय तज्ञांच्या सहकार्याने भटक्या कुत्र्यांचे मानवी पद्धतीने नियंत्रण, लसीकरण व नसबंदी काम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. विटा शहर स्वच्छ, सुरक्षित व नागरिकांसाठी आरोग्यदायी राहावे, यासाठी विटा नगरपरिषद कटिबद्ध असून विटेकर नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे ,असे आवाहन विटा नगरपरिषद मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले आहे.
———————