
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) दि.11जुलै :
अनुसूचित जाती (एस.सी.) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हास्तरावर व्यापक जनआंदोलन उभारण्यासाठी आज धाराशिव येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत आगामी आंदोलनाचे नियोजन, जनजागृती, संघटनात्मक बांधणी आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यासाठी 47 सदस्यीय समन्वय समिती एकमताने जाहीर करण्यात आली.
समन्वय समितीमध्ये कर्मचारी कामगार नेते दलित मित्र शंकरराव खुणे राजाभाऊ ओव्हाळ, धनंजय शिंगाडे, नितीन (बाप्पा) शेरखाने, कैलास शिंदे, संजयकुमार बनसोडे, राजाभाऊ राऊत,विद्यानंद बनसोडे, ॲड. साबने,सतपाल बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, ॲड. गणपती कांबळे, हरिश डावरे, डी. जी. होसलमल, भाई फुलचंद गायकवाड (पाटील), बंडूभाऊ बनसोडे, पत्रकार संतोष खुणे अरुणभाऊ बनसोडे, शांतीनाथ शेरखाने, आनंद पांडागळे, ॲड. के. टी. गायकवाड, एस. के. चेले, भालचंद्र कठारे, अनिल हजारे, बाळासाहेब माने, सुनील गायकवाड, मनीष सोनकवडे, राजेंद्र निकाळजे, काका भंडारे, महादेव वाघमारे, विकास बनसोडे, धनराज सोनकवडे, सुनील वाघमारे, फकीरा सूरवसे, कुंदन वाघमारे, किशोर वाघमारे, बाबा मस्के, दादा सरवदे, राजश्री कदम, विजय बनसोडे, महावीर गायकवाड, राजाभाऊ गायकवाड,शिवाजी ढेरे, शितलकुमार शिंदे, प्रमोद राऊत, मल्लिकार्जुन सोनवणे, सचिन वाघमारे, शितल वाघमारे आणि कुंदन शिंदे,किरण कांबळे, यांचा समावेश करण्यात आला.
बैठकीत एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभर व्यापक जनजागृती अभियान राबविणे, विविध सामाजिक संघटना, संविधानप्रेमी नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले की, सर सेनानी मा. आनंदराज आंबेडकर हे दि. २७ जुलै २०२६ रोजी सोलापूर येथे आयोजित आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चामध्ये उपस्थित राहणार असल्याने, त्यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यात होणारा संविधान बचाव महामोर्चा दि. २७ जुलै ऐवजी दि. २८ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार दि. २८ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संविधान बचाव महामोर्चा काढण्यात येणार असून, या महामोर्चाला सर सेनानी मा. आनंदराज आंबेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
मोर्च्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात येणार असून, एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांचे व आरक्षणाचे संरक्षण करावे आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांशी विसंगत कोणताही निर्णय लागू करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
या महामोर्चात जिल्ह्यातील सर्व ५९ अनुसूचित जातींचे नागरिक, विविध सामाजिक संघटना, युवक, महिला, विद्यार्थी, संविधानप्रेमी तसेच सामाजिक न्यायावर विश्वास असलेल्या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत समितीच्या प्रसिद्धी व जनसंपर्काची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी राजाभाऊ राऊत,मुन्नाभाई ओव्हाळ आणि कुंदन वाघमारे यांची प्रसिद्धीप्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीच्या शेवटी सर्व समन्वय समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी २८ जुलैच्या महामोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी गावोगावी जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे व आजपासूनच जोमाने कामाला लागावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले.