



दर्पण न्यूज खानापूर विटा ( शिराज शिकलगार): -विटा शहरातील अस्त व्यस्त बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना एका छताखाली बैठक व्यवस्था करून देण्यात विटा नगरपालिकेला यश आले आहे. आठवडा बाजारात सर्व भाजी विक्रेत्यांची आज व्यवस्था करण्यात आली. अत्यंत सुसुत्रपणे ही बैठक व्यवस्था झाल्याने इतरत्र रस्त्यावर अनधिकृतपणे कोणाही भाजी विक्रेत्यासव्यवसाय करता येणार नाही. सर्वांची सर्व संमतीने सोय झाल्याने भाजी विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या या निर्णयामुळे वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे.
विटा शहरात रस्त्यावर जागोजागी भाजी विक्रेते बसत होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा तर होत होताच शिवाय आठवडा बाजारात बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांची व्यवसाय होत नसल्याची तक्रार होती. शहराचे विस्तारीकरण होत असल्याने भाजी मंडईची देखिल व्याप्ती वाढविणे गरजेचे असले तरी तुर्तास रस्त्यावर अतिक्रमण करून भाजी विक्रेत्यांनी दुकाने उभी केल्यास वाहतुकीला अडथळा होऊ नये त्यामुळे आठवडा बाजारता सर्वांना एकाच छताखाली आणले जावे यासाठी विटा पालिका प्रयत्नशील होती. आमदार सुहास बाबर यांनी याबाबत तोडगा काढावा अशा सूचना दिल्या होत्या. नगराध्यक्ष काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक टीम तसेच भाजी विक्रेते आणि पालिका यांच्यात समन्वयक म्हणुन रामचंद्र भिंगारदेवे, नगरसेवक संजय भिंगारदेवे,अमर शितोळे, समीर कदम, रणजीत पाटील, शरद सुर्यवंशी यांनी सुसंवाद साधला आणि अत्यंत पारदर्शीपणे व सर्व मान्य तोडगा काढला आणि भाजी विक्रेत्यांना एकाच छताखाली आणण्यात यश आले आहे. यावेळी सर्व भाजी विक्रेते, छोटे मोठे शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.