ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला वेग
दर्पण न्यूज मिरज/सांगली : भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् (Gyan Bharatam) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ झाला असून या मोहिमेला आता वेग येत आहे. नागरिक, संस्था किंवा खाजगी संग्राहकांकडे हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांनी त्याची माहिती ज्ञानभारतम या ॲपद्वारे शासनाला कळवून या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
भारताला हस्तलिखितांचा समृद्ध वारसा लाभलेला असून पारंपरिक ज्ञानाची परंपरा या हस्तलिखितांतून पिढ्यान् पिढ्या जपली गेली आहे. मात्र, ही मौल्यवान हस्तलिखिते देशभर विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ज्ञानभारतम् प्रकल्पाची आखणी केली असून या माध्यमातून हस्तलिखितांचे सर्वेक्षण, नोंदणी, संवर्धन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यावर भर दिला जात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, ग्रंथालये, संग्रहालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. हस्तलिखितांची मालकी संबंधितांकडेच कायम राहणार असून इच्छुकांनी स्वेच्छेने शासनाकडे सुपूर्द केल्यास ती स्वीकारली जाणार आहेत.
सर्वेक्षणाकरिता ज्ञानभारतम (Gyanbharatam) हे ॲप विकसित करण्यात आले असून हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे आहे. या ॲपवर आपल्याकडील हस्तलिखितांची माहिती अपलोड करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून महाराष्ट्रात विविध विद्यापीठे, संशोधन संस्था, सांस्कृतिक संस्था आणि विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आनंद आश्रम संस्थान, पुणे तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून काम पाहणार आहेत. सांगली जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था आणि खाजगी संग्राहक यांना या सर्वेक्षणात सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या राष्ट्रीय मोहिमेत शैक्षणिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित, स्वयंसेवी संस्था, तसेच एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी यांनी या सार्वजनिक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.