– जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात
दर्पण न्यूज जय सांगली : जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत तालुक्यातील देवस्थानांचा विकास आणि प्रत्येक गावात पायाभूत सुविधा तसेच विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिली.
जत येथे पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, जतचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, जत पंचायत समिती सभापती अर्चना पाटील, उपसभापती रविकुमार बगली, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, तहसीलदार प्रवीण धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचरसाठी आणखी निधी लागल्यास तो उपलब्ध करून देऊन सर्व व्यवस्था उपलब्ध करून देऊ. या इमारतीमुळे सामान्य नागरिकांना सुविधा मिळून प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही काम करणे सोयीचे होणार आहे. जत तालुक्यात पहिल्याच टप्प्यात 8 देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या प्रत्येक देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये याप्रमाणे एकूण ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
जत तालुक्यात मागील वर्षात 22 ग्रामपंचायत इमारती मंजूर करण्यात आल्याचे सांगून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जत तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या जाळ्यासाठी एकूण ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, यामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. ज्या गावात स्मशानभूमी नाही त्यासाठीही आवश्यक निधी दिला जाईल. यासाठी प्रस्ताव सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी जत तालुक्यात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची स्तुती केली.