

दर्पण न्यूज पलूस भिलवडी -: स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या यशवंत फेस्टिव्हल पलूस २०२६’ ला तिसऱ्या दिवशीही नागरिकांच्या प्रचंड गर्दीने परिसर उत्सवमय बनला. पलूस शहरासह परिसरातील विविध गावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महोत्सवाचा आनंद घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण महोत्सव परिसर नागरिकांच्या गर्दीने अक्षरशः
गजबजून गेला होता. तिसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा जागर केला.
गर्जा महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष रोहित दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुमार गायकवाड, नगरसेवक अनिल कांबळे, माजी उपसरपंच विजय मोहिते, सुनील गुरव, माजी पंचायत समिती सभापती दीपक मोहिते, उद्योजक हिंदुराव सावंत, मोहिते
वडगावच्या सरपंच शितल मोहिते, प्रशांत के दार, अशोकदादा पाटील, प्रमोद पाटील, चंद्रकांत गोरे, महेश कुंभार, सरपंच आकाराम पाटील, शिवकुमार खारखांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाचे आयोजक प्रदीप (आप्पा) कदम यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकसंस्कृती, परंपरा आणि कलावैभव रंगमंचावर साकारण्यात आले. ढोल ताशांचा गजर, लोकगीते, पारंपरिक नृत्य सादरीकरणे आणि
महाराष्ट्राच्या इतिहासाची झलक दाखवणाऱ्या कलाविष्कारांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कलाकारांच्या दमदार सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. अनेकांनी मोबाईलमध्ये कार्यक्रमाचे क्षण टिपत कलाकारांचे कौतुक केले. महोत्सवात खरेदी, मनोरंजन
आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध आकर्षक स्टॉल्स, घरगुती वस्तू, कपडे, सजावटीच्या साहित्याबरोबरच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनाही
नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी खरेदीसाठी विशेष गर्दी केली होती, तर युवक आणि लहान मुलांनी मनोरंजनाच्या विविध साधनांचा आनंद लुटला.
फनफेअरमधील आकाश पाळणा, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन आणि नावडी या खेळांसाठी तरुणाई आणि लहान मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी आकर्षक रोषणाईने उजळून निघालेला महोत्सव
परिसर नागरिकांच्या गर्दीमुळे अधिकच खुलून दिसत होता. कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी विविध स्टॉल्सना भेट देत महोत्सवातील वातावरणाचा मनमुराद आनंद घेतला.
तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कलाकारांच्या सादरीकरणामुळे उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. विशेषतः गर्जा महाराष्ट्र माझा’ या
कार्यक्रमातील देशभक्तीपर आणि शिवकालीन सादरीकरणांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
दरम्यान, महोत्सवाचे आयोजक प्रदीप (आप्पा) कदम यांनी नागरिकांशी संवाद साधताना, ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांच्या धर्तीवरील महोत्सवाचा अनुभव आपल्या गावातच मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. नागरिकांकडून मिळणारा प्रेमळ, प्रतिसाद आणि उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे सांगितले.