दर्पण न्यूज पलूस प्रतिनिधी : स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप (आप्पा) कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंत फेस्टिव्हल पलूस २०२६’ ला दुसऱ्या दिवशीही पलूसकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने महोत्सव परिसर अक्षरशः फुलून गेला. पलूस शहराबरोबरच आटपाडी, विटा, कडेगाव, वाळवा, कराड, तासगाव या भागातील नागरिकांनी फेस्टिवल पाहण्यासाठी गर्दी केली आहे. यावेळी सादर झालेल्या ‘शिवप्रताप’ नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली.
शिव प्रताप या नाटकाचे उद्घाटन पलूस नगरीच्या नगराध्यक्ष संजिवनी पुदाले यांच्या हस्ते रंगमंच पुजन करून करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते, ज्येष्ठ साहित्यिका वासंती मेरू, नगरसेविका रेखाताई भोरे यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम, सुहास पुदाले, अमोल भोरे, विजय मोहिते, विजय मोरे, सुनील पुदाले, अविनाश जाधव, संजयकुमार शिंदे उपस्थित होते.
पहिल्या दिवसापासूनच नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीदेखील खरेदी, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पलूस शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव आता संपूर्ण परिसरातील आकर्षणाचे केंद्र बनला आहे. महोत्सव परिसरात आकर्षक रोषणाई, विविध स्टॉल्स, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे कुटुंबांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. महिलांनी घरगुती वस्तू, कपडे आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी विशेष गर्दी केली होती.
फनफेअरमधील आकाश पाळणा, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन आणि नावडी या खेळांचा आनंद घेण्यासाठी लहान मुले आणि तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळी संपूर्ण महोत्सव परिसर नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेला होता.
दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ४५ महिला कलाकारांच्या ऐतिहासिक दोन अंकी ‘शिवप्रताप’ या भव्य नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आणि स्वराज्याच्या संघर्षाची गाथा रंगमंचावर प्रभावीपणे उभी करण्यात आली. नाटकातील दमदार अभिनय, भव्य वेशभूषा, संवाद आणि प्रकाशयोजनेमुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले होते. अनेकांनी उभे राहून कलाकारांना टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
महोत्सवाचे आयोजक प्रदीप (आप्पा) कदम यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांच्या धर्तीवरील महोत्सवांचा आनंद आपल्या गावातच मिळावा, या उद्देशाने ‘यशवंत फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. पलूसकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा असून पुढील काळात आणखी भव्य उपक्रम राबवण्याचा प्रयत्न राहील.”
महोत्सवामुळे पलूस परिसरात सध्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी कार्यक्रमांविषयी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, १६ मे रोजी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा लोककला अविष्कार, १७ मे रोजी श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह गायन-नृत्य शो तर १८ मे रोजी भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा होणार असल्याने महोत्सवाची रंगत आणखी वाढणार आहे.
विशेष म्हणजे प्रदीप आप्पा कदम यांनी सर्व विक्रेते आणि नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी प्रदर्शनांचा आनंद घेण्याची संधी दिल्याबद्दल प्रदीप आप्पा कदम यांचे अभिनंदन केले.