
दर्पण न्यूज धाराशिव | (संतोष खुने) :- धाराशिव तालुक्यातील येडशी बस स्थानकात दोन एस.टी. अधिकाऱ्यांनी अधिकृत गणवेश, नावफलक व ओळखपत्राशिवाय प्रवाशांची तिकीट तपासणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक व विभाग नियंत्रक धाराशिव यांना ई-मेलद्वारे तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे. दि. 09 मे 2026 रोजी सायंकाळी अंदाजे 03:15 वाजण्याच्या सुमारास गंगापूर – अक्कलकोट ही एस.टी. बस (क्र. MH.14.MH.8944) येडशी बस स्थानक येथे आली असता दोन तिकीट तपासणी अधिकारी प्रवाशांची तिकीट तपासणी करताना आढळले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी शासनमान्य गणवेश, नावफलक व अधिकृत ओळखपत्र धारण केले नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदर घटनेचे व्हिडिओ व छायाचित्र स्वरूपातील पुरावे उपलब्ध असून आवश्यकतेनुसार विभागीय चौकशीदरम्यान ते सादर करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी नेमके कोण होते, त्यांची नावे, पदनाम, नियुक्तीचे ठिकाण तसेच त्यांना अधिकृत तपासणी आदेश देण्यात आले होते काय, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सेवा शिस्त व आचारसंहिता नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गणवेशाशिवाय सार्वजनिक ठिकाणी अधिकार गाजविणे हे संशयास्पद वर्तन ठरू शकते तसेच त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व आगार व विभागीय कार्यालयांना सक्तीचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास प्रवाशांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजाभाऊ राऊत यांनी निवेदनातून दिला आहे.