दर्पण न्यूज पलूस / रामानंदनगर : प्रतिनिधी
“डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने ग्रामीण भागात असूनही आपला राष्ट्रीय पातळीवरील दर्जा आणि गुणवत्ता सिद्ध केली आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. संस्थेचे कुशल व्यवस्थापन, तज्ज्ञ व संशोधक वृत्तीचा प्राध्यापक वर्ग आणि ध्येयनिष्ठ विद्यार्थी यांच्या त्रिवेणी संगमामुळेच हे महाविद्यालय आज शैक्षणिक, संशोधन, क्रीडा, ए.आय. आणि स्पर्धा परीक्षा अशा सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर आहे,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था साताराचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य जे. के. बापू जाधव यांनी केले.
रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध व्याख्याते व हास्ययात्राकार शरद जाधव उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लोकनेते डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना शरद जाधव म्हणाले की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा घरोघरी नेली आणि हाच वारसा डॉ. पतंगराव कदम यांनी पुढे चालवत शैक्षणिक क्रांती घडवली. त्यांनी उभारलेले संस्थात्मक कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे.” तसेच सध्याच्या धावपळीच्या युगात माणसाने सकारात्मक विचाराने जगणे समृद्ध करावे, असा संदेश देत त्यांनी आपल्या ‘हास्ययात्रा’ कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली.
यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले की, सोशल मीडिया व धावपळीच्या युगात माणूस खऱ्या अर्थाने जगणे विसरला आहे.त्यास माणसा माणसातील हरवत चालला संवाद कारणीभूत आहे. खळखळून हसणे हेच मानवी जीवनासाठी टॉनिक आहे.भूतकाळातील घटनांवर चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या भविष्य काळाला सकारात्मक विचाराने सामोरे गेल्यास जगणे समृध्द होईल.
यावेळी त्यांनी सादर केलेल्या हास्ययात्रा या एकपात्री कार्यक्रमास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी भेट देऊन महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल शुभेच्छा दिल्या. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचे १५ विद्यार्थी भारतीय सैन्य दल व पोलीस दलात भरती झाले, तर २३ प्राध्यापकांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुरस्कार, पेटंट आणि लेखनात यश मिळवले. या सर्व गुणवंतांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी कॉलेज बुलेटीनचेही उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या प्रोफेसर डॉ. यु. व्ही. पाटील यांनी केले. कार्याध्यक्ष प्रोफेसर डॉ. नितीन कुंभार यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले, तर लेफ्टनंट संदेश दौंडे यांनी जिमखाना अहवाल सादर करून खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. के. बी. भोसले, डॉ. गौरी पाटील, सुपरवायझर प्रा.एस. एस. खोत, प्रा. आशिष देशमुख यांच्यासह प्रा. डी. डी. माने, म्हेत्रे सर, रमेश गायकवाड, प्रा. संजय पाटील, मुख्याध्यापक पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांच्या नावांचे वाचन प्रा. अमोल कांबळे, प्रा.सुसेन कांबळे, प्रा.बबन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता कांबळे व प्रा. शुभांगी लवटे यांनी केले, तर आभार प्रा. माधुरी सावंत यांनी मानले. या सोहळ्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.