दर्पण न्यूज मिरज/सांगली : ऑनलाईन खरेदीदार विक्रेता संमेलनानंतर पुढील टप्प्यात आता सांगली जिल्ह्यातील कृषि विषयक उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. या अनुषंगाने फ्लिपकार्टचे अधिकारी येत्या 26 व 27 मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. प्राथमिक टप्प्यात सांगलीची हळद, बेदाणा आणि गूळ ही तीन उत्पादने ऑनलाईन विक्रीसाठी निवडली गेली असून, तिन्ही उत्पादनांच्या क्षेत्र भेटी दि. 26 मार्च रोजी व दि. 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात फ्लिपकार्टचे अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांचे संमेलन होणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिली.
याबाबतच्या पूर्वनियोजन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थनावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयकुमार चव्हाण, कृषि उपसंचालक अमित कवठेकर, जिल्हा विकास आराखडाचे समन्वयक चंद्रकांत पाटील हे प्रत्यक्ष तर दूरदृश्यप्रणालीद्वारे अपेडा चेअरमन डॉ. परशराम पाटील, मित्राचे केदार पवार आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री होण्यासाठी माझी सांगली माझा अभिमान या सांगली पॅटर्न अंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत. या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कृषि व अन्नप्रक्रिया केलेली उत्पादनांची देशभरात ओळख होऊन विक्रीवाढ व्हावी व सांगलीच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळवून देता येईल, या दृष्टीने हे पाऊल टाकण्यात येत आहे. या अनुषंगाने फ्लिपकार्टचे दोन अधिकारी सांगली दौऱ्यावर येत आहेत. त्याचा येथील कृषि क्षेत्राला नक्की फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या पूर्वनियोजन बैठकीत हळद, बेदाणा आणि गूळ या तीन उत्पादनांसाठी निर्मिती व प्रक्रिया या अनुषंगाने क्षेत्रभेटी दि. 26 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहेत. तसेच, दि. 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात फ्लिपकार्टचे अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी आणि शेतकरी यांचे संमेलन होणार आहे.