सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी डीपीसीची साथपोलीस व कारागृह विभागाच्या कामांना मंजुरी

दर्पण न्यूज मिरज/सांगली: जिल्हा नियोजन समिती (DPC) अंतर्गत विविध क्षेत्रात जिल्ह्याचा चौफेर विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. या अनुषंगाने पोलीस दल व कारागृह विभागाच्या पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मंजुरीने व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रयत्नातून पोलीस दल तसेच कारागृह आस्थापना बळकटीकरणासाठी अनेक कामांना मंजुरी देण्यात आली असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
या अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कार्यालयामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची 18 कामे मंजूर करण्यात आली असून, यामध्ये पोलीस निवासस्थानांची उभारणी, एम.टी. सेक्शनसाठी पार्किंग शेड बांधकाम तसेच पोलीस मुख्यालयासाठी संरक्षक भिंतीचे बांधकाम अशा विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांसाठी सुमारे 5 कोटी 69 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे अंतर्गत रस्त्याचे नूतनीकरण करणे व वाहन विभागासाठी मोटर शेडचे बांधकाम करणे अशा दोन कामांसाठी जवळपास 1 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, कारागृह विभागासाठीही पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देण्यात आला आहे. अधिक्षक, सांगली जिल्हा कारागृह, सांगली कार्यालयामध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये कारागृहाचे बरॅक व संरक्षक भिंत विस्तारीकरण, कारागृह येथील तट क्र.१ व २ मधील तटाची उंची वाढवून व त्यावर फेन्सिंग तारेचे कुंपण करणे, इमारतीचे विस्तारीकरण, कंपोस्ट खत मशिनसाठी शेड करणे अशी 8 कामे असून, त्यासाठी 89 लाख, 49 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अधीक्षक तथा संपर्क अधिकारी स्वतंत्रपूर खुली वसाहत, ता. आटपाडी येथील शासकीय निवासस्थानास संरक्षक भिंत बांधकाम व बंद्यांच्या नवीन वसाहतीमधील ड्रेनेजचे काम, महिलांकरिता स्वच्छतागृह बांधकाम, बंद्यांच्या जुन्या वसाहतीची दुरुस्ती करणे आणि चारचाकी वाहन खरेदी करणे अशा चार कामांसाठी 83 लाख 23 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
एकूणच या कामांमुळे पोलीस दल व कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन येत्या काळात जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व आधुनिक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


