महाराष्ट्रसामाजिक

व्हॉईस ऑफ मीडिया’चा महाराष्ट्र भूषण पुरस्कारजिल्हाधिकारी अशोक काकडे यांना सन्मानपूर्वक प्रदान

–          मंत्री मंगलप्रभात लोढा, ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत वितरण

–          जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, मान्यवरांकडून अभिनंदन

दर्पण न्यूज मिरज /सांगली : सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल त्यांच्या शासकीय सेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र शासनाच्या ‘आयुष्यमान भारत मिशनचे, अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी त्यांच्या पत्नी शरदिनी काकडे यांच्यासमवेत हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे जिल्ह्यातील महसूलसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व नागरिकांकडून प्रत्यक्ष भेटून, तसेच दूरध्वनीद्वारे अभिनंदन करण्यात येत आहे.

या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण देऊन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे-देशमुख, प्रबोधनकार सत्यपालजी महाराज, सारडा कचरू हिरालाल, शिवराज पवार पाटील होटाळकर आणि प्रा. डॉ. सविता गिरे पाटील यांचा गौरव करण्यात आला.  यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबईचे अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रमुख संदीप काळे, पुढारी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसन्न जोशी, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक विशाल पाटील आणि जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा व ओमप्रकाश शेटे यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यात राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण व सामाजिक उपक्रमांचा विशेष उल्लेख करून, असे काम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

सन्मान स्वीकारताना अशोक काकडे म्हणाले, “‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रशासन आणि माध्यमे यांचे परस्पर सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी लोकांच्या समस्या पुढे आणून शासनाला योग्य दिशा देण्याचे काम सातत्याने केले आहे. या सन्मानामुळे समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यात घरेलु कामगार आरोग्य तपासणी, एचआयव्हीबाधितांचा वधूवर मेळावा, व्यापारी शेतकरी संमेलन, दिव्यांगांसाठी युडीआयडी शिबिर, लक्ष्मी मुक्ती योजना, हुंडामुक्ती अभियान, मूकबधीर विद्यार्थ्यांना रोबोटिक्स प्रशिक्षण, दिव्यांगांनी व निरीक्षणगृहातील बालकांनी केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन, नारीबलम्‌, शालेय विद्यार्थिनींना मोफत कराटे प्रशिक्षण, अवयवदान चळवळ असे अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणारे व प्रशासनास मानवी चेहरा देणारे उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button