दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):–निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेली SIR (Special Intensive Revision) मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमानुसार राबविण्यात यावी, अशी मागणी भाजपचे अॅड. वैभव सदाशिवराव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अजित गायकवाड, नगरसेवक सुमित गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, प्रशांत कांबळे दहावीर शितोळे, अविनाश चोथे, विनोद पाटील, मंगेश हजारे, प्रतिभा नानी चोथे, अंबिका ताई हजारे, लताताई मेटकरी, विकास जाधव अमित भोसले, विशाल पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
SIR प्रक्रियेमध्ये मतदार याद्यांचे पुनरिक्षण करताना दुबार नावे, मृत मतदारांची नावे, स्थलांतरित मतदारांची नावे तसेच चुकीच्या पत्त्यावर असलेल्या मतदारांच्या नोंदींची योग्य पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र, या प्रक्रियेत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाऊ नये, याची विशेष दक्षता घेण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मतदार यादीतील नाव, पत्ता, भाग क्रमांक आदी माहितीमध्ये त्रुटी असल्यास संबंधित मतदारांना आवश्यक ती दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच मृत, दुबार अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदी नियमानुसार तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत संबंधित प्रशासन व निवडणूक यंत्रणेने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अॅड. वैभव सदाशिवराव पाटील यांनी केली आहे.
