पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील अनियमिततेची चौकशी होणार ; मंत्री डॉ.उदय सामंत
विधान परिषद लक्षवेधी

दर्पण न्यूज मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील रिक्त पदे, एनओसी देण्यातील कथित अनियमितता आणि अधिकाऱ्यांवरील आरोप यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत सदस्य अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील मुख्य अग्निशमन अधिकारी पद 31 ऑक्टोबर 2022 पासून रिक्त आहे. तत्कालीन अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर पात्र अधिकारी उपलब्ध न झाल्यामुळे हे पद रिक्त ठेवण्यात आले असून त्याचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला होता.
अग्निशमन विभागातील पदे भरण्यासाठी 17 ऑगस्ट 2022 रोजी जाहिरात देण्यात आली होती. उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी अशी दोन पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र या पदांसाठी किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याची अट जाहिरातीत असल्यामुळे अनुभव निकष पूर्ण न करणाऱ्या काही उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांनी दिलेल्या एनओसी आणि परवानग्यांबाबत काही अनियमितता झाल्याची शक्यता विधान परिषद सदस्यांनी व्यक्त केली असल्याने, या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची चौकशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांमार्फत किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल, असे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
चौकशीअंती कोणीही दोषी आढळल्यास एक किंवा अनेक व्यक्तींवर कारवाई करण्यास शासन मागे-पुढे पाहणार नाही, असेही मंत्री सामंत यांनी शेवटी सांगितले.

