द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेणार : रोहयो मंत्री भरत गोगावले

दर्पण न्यूज मुंबई : द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यासाठी सर्व विभागाच्या संमतीने आणि विचार विनिमयानंतर निर्णय घेण्यात येईल असे विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना रोहयो मंत्री भरत गोगावले म्हणाले.
नाशिकचे वाईन ग्रेप आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेअंतर्गत समावेश करावा याबाबत राज्य शासन समावेश करणार का, राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणता निर्णय घेत आहे, बेकायदा बेदाणा आयातीवर निर्बंध लावणे, याबद्दल विधानसभेत आमदार रोहित पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.
मंत्री गोगोवले म्हणाले की, बेकायदा बेदाणा आयात रोखण्यासाठी सीमा शुल्क यंत्रणा बळकट करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. कमी दर्जाच्या बेदाणाची गुणवत्ता तपासण्यासाठी एफडीआयकडून ही तपासणी होते का ते पाहून याबाबत निर्णय घेण्यात येईल. द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेअंतर्गत समावेश करण्यासाठी सर्व संबंधित विभाग आणि मुख्यमंत्री यांच्या संमतीने आणि विचार विनिमयानंतर घेण्यात येईल. स्थानिक बेदाण्याला सध्या चांगला दर मिळत असला तरी, अफगाणिस्तानसारख्या देशांतून बेकायदेशीर मार्गाने येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यामुळे बाजारपेठेवर दबाव येत आहे. तासगाव (सांगली) येथील कोल्ड स्टोरेजमध्ये असा आयात केलेला माल स्थानिक नावाने विकण्याचे प्रकार समोर आले असून, संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत बाजार समिती मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे असेही ते म्हणाले.
या प्रश्नाच्या चर्चेत राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, विधानसभा सदस्य अतुल भोसले, विश्वजीत कदम, सुरेश धस, जयंत पाटील, शेखर निकम यांनी सहभाग घेतला.



