सांगलीत आजपासून दोनदिवसीय ग्रंथोत्सव

दर्पण न्यूज सांगली : जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली या कार्यालयामार्फत शनिवार, दि. २८ फेब्रुवारी व रविवार, दि. १ मार्च, २०२६ रोजी सांगली ग्रंथोत्सव- २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. पंत जांभळीकर सभागृह, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली हा ग्रंथोत्सव होणार असून, याअंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान, कथाकथन, ग्रंथ प्रदर्शन व विक्री इ. साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ही माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी दिली.
ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत, तसेच प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी हा ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे.
तत्पूर्वी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यामाई ‘लोकमाता ते कुशल प्रशासक’ या विषयावर व्याख्यान, त्यानंतर ‘अभिजात मराठी साहित्य आणि वाचनसंस्कृती समकालीन वास्तव’ या विषयावर परिसंवाद, दुसऱ्या दिवशी सकाळी चला, विज्ञानाच्या नजरेतून पर्यावरणाचे संवर्धन करुयात… या विषयावर चर्चासत्र, त्यानंतर ‘कथाकथन’ इत्यादी साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर ग्रंथोत्सवाची सांगता होणार आहे.



