शिवजयंतीनिमित्त आयोजित मेगा पदयात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा ; जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज मिरज / सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणेचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांचे गड-किल्ले संवर्धन आणि त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मेगा पदयात्रा आयोजित करण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या सूचना प्राप्त आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता मेगा पदयात्रेचे आयोजन जिल्हा परिषद सांगली ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत करण्यात आले आहे. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी त्यांना नेमून दिलेले कामकाज परस्पर समन्वयाने योग्यरीत्या पार पाडावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेगा पदयात्रेच्या आयोजनाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, नगरप्रशासन शाखेचे सहआयुक्त दत्तात्रय लांघी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, तहसीलदार लीना खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महापालिका क्षेत्रामधील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी मेगा पदयात्रेस उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. पोलीस विभागाने पदयात्रा मार्गावर चोख बंदोबस्त ठेवावा. पदयात्रा काळात पर्यायी मार्गाचे नियोजन करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी. महापालिकेने पदयात्रा मार्गाची व पुतळा परिसराची स्वच्छता करावी. शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण परिसराची स्वच्छता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करावी. कोणताही आजारी विद्यार्थी पदयात्रेसाठी उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने पदयात्रा मार्गावर रूग्णवाहिकेसह तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक ठेवावे. तालुकास्तरावरही पदयात्रा काढण्याचे नियोजन संबंधितांनी तालुकास्तरावर करावे. तसेच किल्ले महोत्सव अंतर्गत संबंधित तालुक्यातील किल्ल्याच्या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली च्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत गाथा छत्रपती शिवरायांची, जागर शाहिरीचा हा कार्यक्रम होणार असून यामध्ये पारंपरिक पोवाडे, शिवस्फूर्तीगीते, मर्दानी खेळ व लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तर गुरूवार, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत महानाट्य “श्रीमंतयोगी” सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. हे कार्यक्रम मोफत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.



