महाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2026-27 आर्थिक वर्षाचा 947 कोटींचा आराखडा राज्य शासनास सादर

 

दर्पण न्यूज कोल्हापूर : जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजना तसेच विविध प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधीची आवश्यकता असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 947.21 कोटींचा प्रारुप आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला. या प्रारूप आराखड्याच्या मंजुरीबाबत राज्यस्तरीय बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागीय क्रिडा संकुल, मनपा कार्यालयाची शेंडा पार्क येथील नवीन इमारत यासह जिल्ह्यातील लोकसंख्या वाढीमुळे आवश्यक सोयीसुविधांसाठी अतिरीक्त निधीची मागणी केली. यानुसार राज्य शासनाकडून तो निधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई येथील बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून या बैठकीसाठी पालकमंत्री आबिटकर यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडीक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

सन 2026-27 करिता राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्याकरता 537.20 कोटीचे नियोजन दिले होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त 410 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून शासनास 947 कोटी रुपयांचा आराखडा आजच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. बैठकीत जिल्ह्यातील प्रारुप आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. तसेच उपस्थिती लोकप्रतिनिधींनीही वाढीव निधी मिळण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!