महाराष्ट्रराजकीयसामाजिक

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देऊ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

राज्यस्तरीय बैठकीत दिली ग्वाही ;   जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी घेतली बैठक

                     

      दर्पण न्यूज मिरज/सांगली : सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव मागणीच्या अनुषंगाने अधिकाधिक निधी देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी मुंबई येथे आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस मुंबई येथून मुख्यमंत्री महोदयांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, सांगली जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, नियोजन विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आदि उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष तर आमदार जयंत पाटील दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर पुणे येथून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 करिता नियोजन विभागामार्फत सांगली जिल्ह्यासाठी कमाल नियतव्यय 545 कोटी 8 लाख रूपये कळविण्यात आला होता. जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून 206 कोटी रूपये अतिरीक्त निधीसह एकूण 751 कोटी 8 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरीक्त निधीची मागणी केली आहे. वाढीव निधी देणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा विकास आराखड्यांतर्गत कवलापूर विमानतळ, मल्टीलॉजिस्टिक्स पार्क यासह जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती दिली.

आमदार इद्रिस नायकवडी व आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी मंजूर करून मिळावा, असे सांगितले.

आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांतून सांगली जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तन झाले असून, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेप्रमाणे अन्य योजनांचेही परिचलन सौरउर्जेवर करण्याबाबत आवाहन केले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून चांगली कामे होत असून, सांगली जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रित आराखडा तयार करावा व पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी मिळावा, अशी विनंती केली.

आमदार सत्यजीत देशमुख यांनीही जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यटनास वाव असून, चांदोली अभयारण्य, कृषि पर्यटनाचा विशेष उल्लेख केला.

पालक सचिव विनिता वेद सिंघल यांनी जिल्हा विकास आराखड्यांतर्गत वन विभागाच्या सहकार्याने पर्यटन विकासांच्या कामांसाठी निधी देण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सादरीकरण केले. यामध्ये सांगली जिल्ह्याच्या नियमित व नाविन्यपूर्ण योजनांतर्गत मागील पाच वर्षातील मंजूर व पूर्ण झालेल्या उत्कृष्ट कामांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रारूप आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती सादर केली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!