काँग्रेसला आपलं मतदान करूया आमदार डॉ विश्वजीत कदम यांना साथ देऊया : स्वप्नाली कदम
भिलवडी येथे जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणातील उमेदवारांचा प्रचारार्थ महिला संवाद मेळावा उत्साहात : महिलांची उत्साही भाषणे अन् महिलांचा मोठा सहभाग

दर्पण न्यूज भिलवडी पलूस (अभिजीत रांजणे):-
भिलवडी आणि परिसराचं प्रेम माझ्यावर कायम आहे. तुम्ही सर्वजण आमच्या कदम कुटूंबियांवर प्रेम करता. अगदी तसंच प्रेम या उमेदवारांना द्या. सात तारखेला मतरूपी त्यांना साथ द्या, असे आवाहन आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनी केले.
भिलवडी येथे जि.प. व पं.स. उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महिला संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या.
स्वप्नाली कदम म्हणाल्या, स्व.पतंगराव कदम यांचे योगदान या मतदारसंघासाठी आहे. विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगांव मतदारसंघाला कुटुंब मानले आहे. सात तारखेला उच्चांकी मतदान देवून नऊ तारखेला विजयी रॅलीत आपण नक्की सहभागी होऊ. उमेदवारांना मतरूपी आशिर्वाद द्या.
नक्कीच ते चांगले काम करतील. आपला आवाज बनतील यात शंका नाही.
काश्मीरमध्ये अडकलेल्यांची कशी सुटका केली. रशियात असणाऱ्या लोकांना कसं सुरक्षित आणलं याची आठवणही सांगितली.
यावेळी ‘एक नारी सब पे भारी’ घोषणा देण्यात आल्या. अनेक महिलांनी आपले विचार व्यक्त केले. स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणी सांगितल्या. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी महापूर व कोरोनात केलेल्या कार्याचा उल्लेख महिलांनी केला.
महिलांच्यात एक जोश आणण्याचे काम या महिला मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले. परिसरातील माळवाडी, भिलवडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ व परिसरातील महिलांची उपस्थिती होती.



