विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बालनिरीक्षणगृहांना भेट

दर्पण न्यूज मिरज /सांगली : बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पार्श्वभूमिवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण / बालगृह व सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींचे निरीक्षण / बालगृह या दोन्ही बालगृहांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, वसतिगृहाचे प्रभारी अधीक्षक मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, विजय कांबळे आणि अश्विनी माळी, दादासाहेब जाधव आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालनिरीक्षण गृहातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, बालनिरीक्षणगृहातील मुलांना पणत्या, आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचे साहित्य घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून मुलांच्या सुप्त कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. या वस्तुंची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाद्वारे विक्री करण्यात आली. तसेच, बालनिरीक्षणगृहातील मुलांसाठी Applus Idiada आणि Worship Earth foundation यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसांची रोबोटिक सेन्सर व ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) शिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बालनिरीक्षण गृहातील मुलांनी तयार केलेल्या वस्तुंची पाहणी करून माहिती जाणून घेतली. मुलांशी संवाद साधताना त्यांनी मुलांना मिळणाऱ्या सुविधांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच, भविष्यात मुलांना काय व्हायला आवडेल, हे जाणून घेऊन मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच, वसतिगृहांची पाहणी केली.
दरम्यान बालसंरक्षण कक्षातर्फे बालविवाहमुक्त महाराष्ट्र आपला – संकल्प अभियान जनजागृती कार्यक्रमांतर्गत बालनिरीक्षणगृहात प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच, वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.
दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते वीर बाल दिवसनिमित्त जिल्हा परिषद सभागृहात वीर बालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.



