ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज मिरज/सांगली : महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभ व वेळेत उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सूविधा केंद्र, आपले सरकार पोर्टलवरील नागरिकांचे लॉगिन याद्वारे उपलब्ध ऑनलाईन सेवांचा जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, तालुक्याच्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र तसेच नागरिक स्वत: ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करुन विविध सेवा प्राप्त करुन घेण्याची सेवा पोर्टलवर उपलब्ध आहे.
उपलब्ध सेवा – उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक दाखला व इतर ११ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या सेवा या शासनमान्य असून अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह प्रक्रियेने कमीतकमी वेळेत नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या जातात. सांगली जिल्ह्यामध्ये ०१ एप्रिल २०२५ पासून आजपर्यंत ६ लाख ६२ हजार ५९८ इतक्या सेवा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६ लाख २९ हजार ६९० (९७.१९ टक्के) इतक्या सेवा नागरिकांना विहित मुदतीमध्ये देण्यात आल्या असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.



