राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते ;सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील
पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली) राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचा मौजे दुधोंडी येथे समारोप

दर्पण न्यूज पलूस :- राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आई-वडील व गुरुजनांचा आदर करणे आवश्यक आहे, असे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली) राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे दुधोंडी याठिकाणी पार पडले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक *राजाराम पाटील* प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजाराम पाटील म्हणाले की, *“विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आई-वडील व गुरुजनांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्कार, शिस्त आणि समाजाप्रती जबाबदारी यामुळेच व्यक्तिमत्त्व घडते.”* राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते असेही त्यांनी नमूद केले. शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी श्रमदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जनजागृती यासारखे उपक्रम राबवले. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान मिळाले असे आयोजकांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानसिंग को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन सुधीर जाधव होते. तसेच कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. निर्मलाताई जाधव, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. यु. व्ही. पाटील, उपप्राचार्या डॉ. जी. आर. पाटील, डॉ. के. बी. भोसले, ग्रामपंचायत सदस्य राजेश तिरमारे, बब्बर मुजावर, तानाजी नलवडे, कुमार साळुंखे, प्रदीप राणमाळे, अनिल शेवाळे, श्रीकांत कदम, शहाजी जाधव, भीमराव जाधव, सर्जेराव साळुंखे, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बबन पाटील यांनी केले, प्रस्तावना प्रा. धनेश गवारी तर आभार प्रदर्शन डॉ. अमोल कांबळे यांनी केले.



