सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न “हुंडामुक्ती अभियान” राबवण्यात येणार

दर्पण न्यूज मिरज/ सांगली : हुंड्याच्या कुप्रथेविरोधात समाजमनाला परिवर्तनासाठी आवाहन करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ‘सांगली पॅटर्न’ हुंडामुक्ती अभियानाच्या माध्यमातून ठोस पाऊल उचलण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून हुंडामुक्त विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबांचा जागतिक महिला दिनी, दि. 8 मार्च रोजी प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांनी दिली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील म्हणाल्या, 21 व्या शतकातही अनेक ठिकाणी हुंड्याची सामाजिक कुप्रथा अस्तित्त्वात आहे. हुंड्यासारख्या अमानवी प्रथेमुळे विवाह हा व्यवहार होतो. स्त्रीवर दबाव टाकून तिचे मानसिक व शारीरिक शोषण होण्याचे प्रकार होतात. सामाजिक प्रगतीला अडसर ठरणारी ही कुप्रथा असून विवाहानंतर सोनेरी आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या विवाहेच्छुक किंवा नवविवाहितांच्या पवित्र नात्यामध्ये यामुळे अंतर निर्माण होते. त्यामुळे या कुप्रथेचे उच्चाटन करून हुंडामुक्त विवाहाची सामाजिक चळवळ उभारून सांगली जिल्ह्याची वाटचाल हुंडामुक्तीकडे करणे या उद्देशातून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षा पाटील म्हणाल्या, या अभियानामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मदतीने तालुक्यात हुंडाप्रथाविरोधी जनप्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत विवाह झालेल्या जोडप्यांच्या पालकांकडून हुंडा घेतला व दिला नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल. यामध्ये संबंधितांनी व त्यांच्या कुटुंबाने विवाहात हुंडा मागणी केली नसल्याचे व हुंडा दिला नसल्याचे शपथपूर्वक कथन करणे आवश्यक आहे. सदरचे प्रतिज्ञापत्र जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे सादर करणे आवश्यक आहे. अशा जोडप्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी हुंडाप्रथेविरोधी इतरांना प्रेरणा दिल्याबद्दल जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी संबंधितांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, या अभियानासाठी विशेष योगदान देणाऱ्या, आणि अधिकाधिक कुटुंबांना हुंडामुक्तीचा संदेश देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा महाराष्ट्र दिनाच्या आसपास विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून हळूहळू ग्रामस्तरापर्यंत हुंडाप्रथाविरोधी विचार झिरपत जाईल, अशी आशा व्यक्त करून वर्षा पाटील म्हणाल्या, हुंड्यामुळे महिलांना मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, अपमानास्पद वागणूक सहन करावी लागते. यातून विवाहितेच्या जीवितास धोका उत्पन्न झाल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतून प्रेरणा घेऊन अभियान राबवले जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाने हुंडाप्रथेविरोधात भूमिका घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करून, हुंडामुक्ती अभियानातून केवळ हुंडा न घेणे व देणे नाही, तर स्त्रीचा सन्मान, समानता आणि सुरक्षिततेचे महत्त्व समाजात रूजवले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.



