महाराष्ट्रसामाजिक

धर्मांध वातावरणात लोकशाही जिवंत ठेवणे म्हणजे कॉ. गोविंद पानसरेंचे विचार जपणे होय : दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर, अनिल पाटील

: कॉ. गोविंद पानसरे यांचे विचार क्रांतिकारी होते. बहुजन कष्टकरी जनतेसाठी त्यांनी लढा उभा केला. सध्याच्या धर्मांध वातावरणात लोकशाही जिवंत ठेवणे म्हणजे कॉ. गोविंद पानसरेंचे विचार जपणे होय असे प्रतिपादन विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केले.
ते मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, निर्मिती विचारमंच, आम्ही भारतीय महिला मंच, निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित बहुजन-कष्टकरी चळवळीचे कामगार नेते, दिशादर्शक विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या येथे आयोजित ‘कविता इन्कलाबी’ हा परिवर्तनवादी, प्रागतिक विचारांच्या काव्य मैफलीच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना, फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जीभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो, दिवाळीला घर रंगवताना, रंगाचीच फार भीती वाटली, लोक हरामी घराचा रंग बघून, माणसाची जात ठरवतात, म्हणून मी सगळं घरच पांढरशुभ्र केलं, मी जातीला चूना लावला, आणि मी माणसात आलो. यासह इतर अनेक विद्रोही कविता सादर केल्या.
यावेळी कवी व दिग्दर्शक अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘कविता इन्कलाबी’ मध्ये म्हमाने यांनी अण्णा म्हणजे कॉम्रेड, कष्टकरी चळवळीचे कार्यकर्ते, नेते, दिशादर्शक विचारवंत, परिवर्तनाच्या चळवळीचा झंजावात म्हणजे अण्णा, आपला जिवाभावाचा मोठा भाऊ म्हणजे अण्णा, अण्णा आमचा बाप, तुम्ही, आमच्या बापाला मारून आम्हाला पोरकं केलं, बापाला मारलं म्हणजे आम्ही घाबरू, किती मोठा गैरसमज, खरं आहे, आमच्या बापाला तुम्ही शरीराने संपवलं , पण तुम्हाला संपवता आला नाही, त्यांचा विचार, अण्णा जिवंत आहेत, आजही माझ्यात, तुमच्यात, आपल्या सर्वांच्यात, एक क्रांतिकारी विचारशक्ती बनून ही कॉ. गोविंद पानसरे यांना अभिवादन पर कविता सादर केली.
आंबेडकरवादी कवी व शाहीर रणजित कांबळे म्हणाले, चळवळ हा केवळ गप्पा मारायचा विषय नाही तर तो आता जगण्या-मरण्याचा विषय झाला आहे. त्यामुळे विचारधारेशी ठाम असणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, गंगाधर म्हमाने
अर्हंत मिणचेकर, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह भरत लाटकर, सुनील जाधव, डॉ. कपिल राजहंस, सुरेश केसरकर, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, व्यंकाप्पा भोसले, संजय अर्दाळकर, मिलिंद यादव, दयानंद ठाणेकर, कॉ. दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदी मान्यवर व कॉ. गोविंद पानसरे यांना मानणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाशक करण्यात आले.
स्वागत सुरेश केसरकर, प्रास्ताविक डॉ. कपिल राजहंस, आभार ॲड. करुणा विमल यांनी मानले तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर, अर्हंत मिणचेकर यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!