सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी उपाय योजावेत : जिल्हाधिकारी अशोक काकडे
जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत सूचना

दर्पण न्यूज मिरज/ सांगली, : भटक्या, मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. महादेव गवळी व डॉ. कृष्णा माळी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोस्वामी आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भटक्या, मोकाट कुत्र्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे तसेच त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करावे व रेबीज संशयित कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून उपाययोजना करावी. यासाठी तक्रार प्रणाली किंवा हेल्पलाईन उपलब्ध ठेवावी. कुत्रे पकडणाऱ्या व्यक्तिंना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले. तसेच, डॉग शो किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी प्राण्यांचा वापर करणाऱ्यांनी संबंधित प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी घेऊनच डॉग शो आयोजित करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कोणत्याही प्राण्याचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तिने त्या प्राण्याची काळजी घेण्याबाबत उपाययोजना करावी. त्यांना वेदनादायी पद्धतीने हाताळू नये. जंगली श्वापदे व अन्य मोकाट जनावरांपासून मानवावर होणाऱ्या हल्ल्यांच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने नगरपालिका, वन विभाग, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, परिवहन विभाग आदि संबंधित विभागांशी कालबद्ध समन्वय बैठका घ्याव्यात, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, भटकी, मोकाट कुत्री यांची संख्या जास्त असलेल्या गावांची यादी तयार करावी. संबंधित ग्रामपंचायतींना याबाबत प्राधान्य तत्त्वावर कार्यवाही करण्याचे निर्देश देऊ. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण तसेच लसीकरण प्रक्रिया योग्यरीत्या होत असल्याची खात्री करावी.
या बैठकीत प्राण्यांच्या स्पर्धा, भटकी, मोकाट कुत्री यांच्यासंबंधी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



