नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 : उमेदवारांना आता ऑफलाईन पध्दतीनेही नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार
रविवार दि.16 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार

दर्पण मिरज / सांगली – : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालय नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा (उरुण- ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस) व 2 नगरपंचायत (शिराळा, आटपाडी) यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा दि. 10 नोव्हेंबर 2025 ते दि. 17 नोव्हेंबर 2025 (सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 पर्यंत) आहे. तसेच या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे.
परंतु, आता संगणकप्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेले असल्याने तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र दि. 15 ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी 11.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्र आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील असे निर्देश दिले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


